काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच विषयावरचा चित्रपट पाहिला,चित्रपटाचे नाव होते "गुलाबजाम". सगळ्यांचा अत्यंत जवळचा विषय म्हणजे खाणे त्यासाठी अगदीच फुडी असावे लागते असे नाही.हा चित्रपट मला आवडला कारण ह्यात इतर चित्रपटांसारखं नायक-नायिका ,त्यांच्यातील प्रेम,मग खलनायक किंवा प्रेमाचा त्रिकोण आणि मग हॅपी एंडिंग असं काही नाहीये.
या चित्रपटातील नायक आणि नायिका अगदी वेगळे आहेत.चित्रपट थोडासा संथ आहे पण छान आहे.तर चित्रपटातील नायक आदित्य ह्याचं चित्रपटातील एक वाक्य आहे,
"माणसाचं कसं असतं ना ,एखादी गोष्ट नुसती चालू ठेवली की बरं असत.पण मधेच तुमचं मनं तुम्हाला प्रश्न विचारत ,की हे तुला आवडतंय का?.....................
मग वाट लागते."
अर्थात हा चित्रपट असल्याने तो नायक अत्यंत जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी त्याला मदत करणाऱ्या त्या नायिकेच्या आयुष्यात ही खूप सकारात्मक बदल घडवून आणतो.
आपल्या आजूबाजूला पाहिले तर या मनस्थिती तुन मार्गक्रमण करणारे खूप लोकं आपल्याला दिसतील.व्यक्ती तितक्या प्रकृती(प्रवृत्ती) याप्रमाणे विचार केला तर ,प्रत्येकाची संघर्ष करण्याची तयारी आणि गोष्टी समजून घेण्याची कुवत ही वेगवेगळी असते.
काही मोजकी लोकं ही धेयनिष्ठ असतात आणि प्रतिकूल परिस्थितीत पण आपले स्वप्न पूर्ण करतात.तर काही लोकं अगदी ह्याच्या उलट असतात प्रतिकूल परिस्थिती दिसली की हातपाय गाळुन मृत्यू जवळ करतात.
परंतु सगळ्यात जास्त गोची होते ती मधल्या लोकांची ,स्वप्न चांगली वाटतात पण त्याचा पाठपुरावा करायला जमत नाही आणि मृत्यू जवळ करावा हे मनाला पटत नाही आणि त्यासाठी लागणारे धैर्य गोळा करत येत नाही.
अर्थात हे सर्व माझे निरीक्षण आहे आणि तसेही दुसऱ्याच्या फुटपट्टीने आपण आपले जगणे मोजायचे /ठरवायचे नसते.आजवर अनेक अनुभवी व दिग्गज लोकांनी त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान सांगितले आहे त्यात मी पामर काय सांगणार.परंतु एक मात्र सांगू इच्छिते की,माणसाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे.
धन्यवाद.
रजनी