Sunday, 30 August 2020

बायकोच्या मनातला आवाज


एके दिवशी अचानक चमत्कार झाला
बायको बोलली मनात अन
आवाज कानी आला
आवाजसरशी त्या मी सावधान झालो
चादरीची घडी घालून बेड आवरू लागलो

चेहरा मख्ख ठेवून ती मनात पुटपुटली
कोण जाणे आज यांना कशी अक्कल सुचली
वेळ न दवडता मी मग अंघोळीला निघालो
परत एकदा आवाज ऐकून दारातच थबकलो

आताच सुचलेली अक्कल परत कुठे हरवली
टॉवेल न घेता स्वारी अंघोळीला निघाली
आता चांगले तासभर चालेल यांचे रास नहाण
ओला टॉवेल मात्र पलंगावर तसाच भिरकावणार

तिचे स्वगत ऐकून  मनीं केला विचार
जर वेगळे वागूया अन तिला खुश करूया
अंघोळ उरकून पंधरा मिनिटात टॉवेल टाकला दांडीवर
अन नाश्त्यासाठी ऐटीत जाऊन बसलो सोफ्यावर

आनंदाने घालत शीळ बायकोला बोलावले
पण सुरू राहिलेल्या गिझर ने त्यावर गरम पाणी फिरवले
गप्प पणे नाश्ता उरकला ऐकत तिचे मुक्त स्वगत
असे वाटत होते जणू तिच्या मुखात साक्षात सरस्वतीच आहे नाचत

बायकोला जवळ बोलवून मी क्षणभर न्याहाळले
चेहरा होता कोरडाचं परी चालु होते पुटपुटणे
मिठीत घेता अशी अचानक  लाजळू सम लाजली
पण हाय रे देवा या ही वेळी मनातल्या मनात तिने
माझीच वाट लावली.

रजनी


Wednesday, 26 August 2020

लेखकाचे स्वप्न


       

लेखक होणे मित्रांनो
सोप्प नसत काही
अव्यक्त ते व्यक्त
करणं नेहमीच जमतं नाही

यमक आणि  शब्दरचना
दरवेळी जुळत नाही अन
शब्दांचा अबोला तर
लेखणीला ही झेपत नाही

लेखकाचे स्वप्न असते
शब्द शब्द फुलवावे
नुसते यमक च नाही
तर भाव ही लेखणीतून झिरपावे

मनासारखी कलाकृती जेव्हा
कागदी उमटते
लेखकाचे स्वप्न तेव्हा
लेखणीतून अवतरते.

रजनी

Tuesday, 25 August 2020

दुसऱ्या प्रेमाची पहिली गोष्ट(अलक कथा)


ती एक कॉलेजमधली विद्यार्थिनी,दिसायला चारचौघींसारखी पण अभ्यास आणि इतर गोष्टीमध्ये हुशार.ती  खूप शांत होती पण औपचारिकता म्हणूंन एका ग्रुप मध्ये असायची.त्या ग्रुप मध्ये दोन मुले होती,एक कॉलेज चा चॉकलेट बॉय तर दुसरा तिच्यासारखाच मितभाषी.
                  एक दिवस काही मुलांनी चॉकोलेट बॉयला चॅलेंज केले आणि त्याने तिला प्रपोज केले.तिलाही जरा नवल वाटलं  पण त्याच वलंयच अस होत की तिने ही होकार दिला.त्याच चॅलेंज पूर्ण झाले पण तिचे मात्र आयुष्य बदलून गेले.त्याच्या प्रेमात ती इतकी आकंठ बुडाली की स्वतः चे अस्तित्व जणू विसरली.

                      ग्रुप मधला दुसरा तो ,हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघण्याखेरीज दुसरे काहीच करू शकत नव्हता.एक दिवस अचानक तिच्या डोळ्यांवरची त्याचा प्रेमाची झापडे गळून पडली.ती मग आणखीनच आपल्या कोषात गेली.
             आता मात्र त्याने ठरविले ,काही ही झाले तरी तिला परत पहिल्यासारखे करायचे.तिच्या एक मैत्रिणीच्या मदतीने तो जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवू लागला.तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू लागला.हळूहळू तिचं लाईफ नॉर्मल होऊ लागलं.हे सर्व करताना खरंच तो तिच्या प्रेमात पडला.
                 इतक्या दिवसांच्या सहवासाने तो किती सच्चा आहे ,हे तिला जाणवलं होत .त्याने न सांगताच त्याचं प्रेमही तिला कळलं होतं.अखेर त्याच्या मुळेच तर तिला तिचा आत्मविश्वास परत मिळाला होता.ती पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकली होती.त्याच म्हणणं तिला पटलं होत ,जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही ती इतरांवर कशी प्रेम करणार.म्हणूनच आज ती दुसऱ्यांदा प्रेमात पडली होती आणि ही दुसऱ्या प्रेमाची पहिली  गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवणार होती.
           

रजनी


 
 

Monday, 24 August 2020

पाऊस



आयुष्याचा वेगवेगळ्या वळणावर पाऊस आपल्याला भेटतो.पाऊस तोच असतो पण संदर्भ बदलत जातात म्हणूनच नेहमीचा पाऊस आपल्याला दरवेळी वेगळा भासतो.

पाऊस लहानपणीचा..........
निरागस अन अल्लड
कागदी होडी अन भिजण्याची धडपड

पाऊस शालेयजीवनातला…..........
आला जून अन शाळेची चाहूल
पावसाचे तेव्हाच पडते पाहिले पाऊलं

रेनकोट ,छत्री ,दप्तरांची गर्दी
पाऊसही नेमकी लावतात तेव्हाच वर्दी

पाऊस किशोरवयीन…............
सरींवर सर हवीहवीशी
ओढ अनामिक सहवासाची

पाऊस कॉलेजमधला..........
 कॅन्टीन चा चहा आणि गरमा गरम भजी
  मित्रमैत्रिणीचा घोळका अन चिंब भिजलेली ती

पाऊस प्रेमात पडल्यावर..........
आभाळातला पाऊस अन
प्रेमाचा पाऊस
एकाच छत्रीत

पाऊस लग्नानंतरचा...........
अर्धवट भिजलेली ती
हातामध्ये वाण सामान
बस मध्ये तोबा गर्दी
अन भले मोठे ट्राफिक जाम

पाऊस मध्यम वयाचा.......
न सांगताच खमंग कांदा भजी
तिचे स्मित हास्य अन चहाचा दरवळ

पाऊस उतारवयाचा........
बाहेर पाऊसाची रिमझिम
आत आठवणींच्या सरी
मनं धावे भूतकाळी
अन काया विसावे खिडकीशी

पाऊस एकटेपणाचा..........
पाऊस वाटे हवाहवासा
तोच सोबती एकटेपणाचा

रजनी


 

Wednesday, 19 August 2020

ओल्या सांजवेळी



ओल्या सांजवेळी
या संधीप्रकाशात
तुझी आठवण येते
अश्या ओल्या क्षणांत

डोळे मिटुनी मग मी
त्या आठवणीत रमते
स्पर्श तुझा आठवता जणू
मोरपीस गाली फिरते

अश्या कातरवेळी
अन ओल्या सांजवेळी
तुझ्या आठवणीत मनं
चिंब चिंब भिजते

रजनी



 

Friday, 14 August 2020

गुलाबजाम

 


काही दिवसांपूर्वी एका वेगळ्याच विषयावरचा चित्रपट पाहिला,चित्रपटाचे नाव होते "गुलाबजाम". सगळ्यांचा अत्यंत जवळचा विषय म्हणजे खाणे त्यासाठी अगदीच फुडी असावे लागते असे नाही.हा चित्रपट मला आवडला कारण ह्यात इतर चित्रपटांसारखं नायक-नायिका ,त्यांच्यातील प्रेम,मग खलनायक किंवा प्रेमाचा त्रिकोण आणि मग हॅपी एंडिंग असं काही नाहीये.

          या चित्रपटातील नायक आणि नायिका अगदी वेगळे आहेत.चित्रपट थोडासा संथ आहे पण छान आहे.तर चित्रपटातील नायक आदित्य ह्याचं चित्रपटातील एक वाक्य आहे, 

"माणसाचं कसं असतं ना ,एखादी गोष्ट नुसती चालू ठेवली की बरं असत.पण मधेच तुमचं मनं तुम्हाला प्रश्न विचारत ,की हे तुला आवडतंय का?.....................
मग वाट लागते."     
          अर्थात हा चित्रपट असल्याने तो नायक अत्यंत जिद्दीने त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी त्याला मदत करणाऱ्या त्या नायिकेच्या आयुष्यात ही खूप सकारात्मक बदल घडवून आणतो.
            आपल्या आजूबाजूला पाहिले तर या मनस्थिती तुन मार्गक्रमण करणारे खूप लोकं आपल्याला दिसतील.व्यक्ती तितक्या प्रकृती(प्रवृत्ती) याप्रमाणे विचार केला तर ,प्रत्येकाची संघर्ष करण्याची तयारी आणि गोष्टी समजून घेण्याची कुवत ही वेगवेगळी असते.
           काही मोजकी लोकं ही धेयनिष्ठ असतात आणि प्रतिकूल परिस्थितीत पण आपले स्वप्न पूर्ण करतात.तर काही लोकं अगदी ह्याच्या उलट असतात प्रतिकूल परिस्थिती दिसली की हातपाय गाळुन मृत्यू जवळ करतात.
         परंतु सगळ्यात जास्त गोची होते ती मधल्या लोकांची ,स्वप्न चांगली वाटतात पण त्याचा पाठपुरावा करायला जमत नाही आणि मृत्यू जवळ करावा हे मनाला पटत नाही आणि त्यासाठी लागणारे  धैर्य गोळा करत येत नाही.
            अर्थात हे सर्व माझे निरीक्षण आहे आणि तसेही दुसऱ्याच्या फुटपट्टीने आपण आपले जगणे मोजायचे /ठरवायचे नसते.आजवर अनेक अनुभवी व दिग्गज लोकांनी त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान सांगितले आहे त्यात मी पामर काय सांगणार.परंतु एक मात्र सांगू इच्छिते की,माणसाने नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे.

धन्यवाद.
रजनी
            

         

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...