Thursday, 28 January 2021

मी लिहिलेलं पत्र


 

काय सांगू मंडळी
त्या दिवशी काय घडलं
त्यांनी वर्गात पाऊल टाकताच
माझं हृदय की हो चोरलं😘

त्या दिवशी सुरू झाला
नजरभेटीचा खेळ
पण भेटीचा आमच्या
बसेना ताळमेळ🙂

त्यांच्यासकट विषयात त्यांच्या
रस घेऊ लागले
अन प्रोजेक्ट असाइनमेन्ट
सर्व वेळेत होऊ लागले☺️

दिवसांनमागून दिवस लोटले
सेमिस्टर एक संपली
पण हाय हॅलोच्या पुढे
आमची गाडी नाही सरकली😡

एक दिवस हिम्मत करून
पुस्तक द्यायला गेले
अन पुस्तकाच्या मधोमध
माझे पत्र ठेवले☺️☺️

दुसऱ्यादिवशी घाबरतच
पुस्तक घ्यायल गेले
अन माझे पत्र बघून
डोकं माझं चक्रावले😡

पत्रात मी प्रेमाच्या
भावना होत्या  मांडल्या
पण कर्तव्यदक्ष शिक्षकाने त्यात
शुद्धलेखनाच्या चुका  काढल्या😡😏

आदर्श शिक्षकापरी त्यांनी
मूल्यमापन केले
अन  पत्राला माझ्या
दहापैकी पाच मार्क दिले😡😏

झुळूक येऊन हातातील
पत्र माझे गळले
अन क्षणार्धात लक्ष
माझे पत्रामागे खिळले🙄🤔

सुंदर सुबक अक्षरात
शेरा होता लिहिलेला
सोबत लफ्फेदार
सही होती जोडीला🙄

अक्षर वळणदार पण ह्रस्व ,दीर्घ यातील
फरक काय तो ओळखा
अन करायचं असेल प्रेम
तर  सध्या भाषेवर प्रेम करा😡😁😁😁😂😂

रजनी✍️



Wednesday, 27 January 2021

हळहळ

 

धकाधकीच्या या युगात
माणसे लबाडपणे वागतात
सरड्यालाही लाजवतील असे
पटापट रंग बदलतात
माणुसकी राहिली नाही
म्हणतं चारचौघात हळहळतात
अन जरा कुणी मदत मागितली
तर शंभर कारणे सांगतात

रजनी✍️


Tuesday, 26 January 2021

काळाचा घाव


 

काळाचे घाव सोसाताना
एक मात्र जाणवलं
कळतनकळत त्याने
खूप काही शिकवलं

काळ पुढे सरकत जातो
उरतात फक्त आठवणी
आपण मात्र तिथेच राहतो
करीत त्यांची उजळणी

काळच देतो दुःख
अन काळच बनतो दवा
पण या सगळ्यासाठी
थोडासा संयम मात्र हवा

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला ही देवपण येत नाही
अन काळाचे घाव सोसल्याशिवाय
माणसाला माणूसपण येत नाही

रजनी✍️



ती,तो आणि "पाऊस"



ती एक अल्लड अवखळ आणि सुंदर मुलगी,एकुलती एक आणि आईबाबांची लाडकी.आईबाबांची लाडकी असली तरी ती लाडावलेली मुळीच नव्हती.तिला तिच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती.वडील एका खाजगी कंपनीत तुटपुंज्या पगारावर कामाला आणि आई छोटे मोठे शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती.
           परिस्थिती बेताची असली तरी ,आहे त्यात समाधान मानून आनंदाने जगायचं बाळकडू तिला लहानपणासूनच आईबाबांकडून मिळाले होते,आणि ती ही शहाण्या मुलीसारखी आनंदाने राहत होती.आपल्या आईबाबांवर तिचं खूप प्रेम होतं आणि त्यांच्यावर अधिक आर्थिक भार पडणार नाही याची नेहमी दक्षता घेत होती.असेच रोजचे दिवस चालले होते पण तिच्या या सुखाला जणू कुणाचीतरी नजर लागली आणि तो दिवस उजाडला.26 जुलै च्या पावसाने सर्व होत्याच नव्हतं केलं.पावसात तिचे बाबा वाहून गेले आणि त्या धक्क्याने आईला हृदयविकाराचा झटका आला,आणि एकाच वेळी आईबाबांचे छत्र तिच्यापासून हिरावले गेले.
                हा आघात इतका मोठा होता की,ती अल्लड अवखळ मुलगी अचानक शांत झाली.आईबाबांच्या अचानक जाण्याला हा पाऊसच कारणीभूत आहे असे तिच्या मनाने घेतले.बाहेर जरा पाऊस पडु लागला की अस्वस्थ होऊ लागली .ढगांच्या सध्या गडगडण्याने पण घाबरू लागली.
               नातेवाईकांपैकी एक काका पुढे आले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेले.काका आणि काकू स्वभावाने चांगले होते पण तिला या दुःखातून बाहेर पडायला खूप वेळ लागणार होता.तरीही आईबाबांची शिकवण ती विसरली नव्हती ,स्वतःचा अभ्यास सांभाळून काकू ला मदत करीत होती.लवकरच शिक्षण संपवून ती छोटे मोठे काम शोधू लागली.
                तिच्या मेहनतीने तिला एक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळाली.आता काकांना तिच्या लग्नाची काळजी सतावू लागली.लवकरच त्यांनी  त्यांच्या समाजाच्या वधूवर सूचक मंडळात तिची नाव नोंदणी केली.
ती देखणी असली तरी आईबाबांचे छत्र हरवलेली मुलगी म्हणून येणारे स्थळ नकार देऊ लागले.अशातच त्याच स्थळं सांगून आलं.तो दिसायला देखणा,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे परिस्थितीने थोड्याफार प्रमाणात हिच्यासारखाच होता.पाहताक्षणी ती त्याला खूप आवडली.तिलाही तो पसंत होता पण अजूनही ती पुरती सावरली नव्हती.तिच्या काकांनी पुढाकार घेऊन त्यांना एकदा आपसांत भेटून निर्णय घेण्याची परवानगी दिली.ठरल्याप्रणाने ती दोघे एका हॉटेल मध्ये भेटले.शांत झालेली ती अधिकच संकोचली.पहिल्या भेटीतच त्याने ओळखले की,ही खूपच हळवी मुलगी आहे .
              दुसऱ्याच दिवशी त्याने त्याचा निर्णय काकांना कळवळा.मुलगा चांगला आहे म्हणून तिची संमती घेऊन काकांनी त्यांचं लग्न ठरवलं.हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला.दोघांचेही नियमितपणे फोनवर संभाषण सुरू असायचे.एकदा असेच तिच्याशी बोलताना त्याने त्याच्या लग्नानंतरच्या पहिल्या पावसाबद्दलच्या फॅन्टसी बद्दल सांगितले.त्याने ठरवले होते की, लग्नानंतरचा पहिला पाऊस तो फक्त आणि फक्त त्याच्या पार्टनरसोबत म्हणजे तिच्यासोबत एन्जॉय करणार होता.तो संपूर्ण दिवस तो तिच्यासोबत समुद्रकिनारी घालवणार होता.वास्तविक पाहता हा क्षण कुठल्याही मुलींसाठी आनंदाचा होता पण ती थोडीशी असहज झाली तिच्या मनातील पावसाची अढी तिला प्रतिसाद देण्यापासून थांबवू लागली.तिने घाईने फोन कट केला.
                 अचानक फोन कट झाल्याने तो गोंधळून गेला.यथावकाश त्यांचे लग्न झाले नवे नावलाईचे दिवस अगदी मजेत चालले होते.मुळातच समजूतदार असल्याने तो तिला प्रत्येक वेळी जपत होता समजून घेत होता.आणि अखेर तो दिवस आला व सुदैवानं तो रविवारचा होता.सकाळपासून आभाळ दाटल होत आणि कुठल्याही वेळी पावसाचं आगमन होणार होत.तो सकाळपासून खूप खुश होता आणि ती अस्वस्थ आतापर्यत त्याला तिच्या या अवस्थेबद्दल कळलं होतं आणि तिला यातून बाहेर काढायचं व आपली फॅन्टसी ही पूर्ण करायची हे त्यानं पक्के ठरवलं होतं.
          जशी पावसाला सुरुवात झाली त्याने तिला तयार व्हायला सांगितलं.ती अजूनही अस्वस्थपणे शून्यात बघत बसून होती.तो तिच्या जवळ गेला आणि हळुवारपणे तिला आपल्या मिठीत घेतले.ती आणखीनच त्याला बिलगली आणि बाहेर जाण्यास नकार देऊ लागली.त्याने तिचा हात हातात घेतला व बोलू लागला ,"तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग विश्वास ठेव काही होणार नाही,चल बाहेर मस्त भटकू आणि तरीही तुला बरं वाटलं नाही तर परत फिरू ओके."
                  ती तयार होऊन आली,त्याने बाईक काढली आणि तिचा हात छातीशी घट्ट धरून बाईक सुरू केली.त्याच्या स्पर्शाने ती सुखावली.तो बाईक तसा हळू चालवत होता परंतु पावसाचा जोर वाढला होता.इकडे हिची अस्वस्थता वाढू लागली ,"पावसामुळे बाईक स्लिप झाली तर किंवा बाईक चा अपघात झाला तर काय होईल?असे विचार तिच्या मनांत येऊ लागले त्याने तिचा चेहरा खूप चिंताग्रस्त झाला.त्याने साईड मिरर मधून तिचा चेहरा पाहुन तिला आश्वस्त केले.
              लवकरच ते समुद्रकिनारी पोहचले,बाईक पार्क करून तो तिच्या कमरेत हात घालून तिला समुद्रकिनारी घेऊन गेला.इतक्या दिवसांच्या सहवासाने आणि त्याच्या हळुवार वागण्याने ती खरंच त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती म्हणूनच ती त्याच्यासाठी अधिकच पझेसिव्ह झाली होती.आता कुठलाही धक्का ती सहन  करण्याच्या मनःस्थितीत नव्हती.तिच्या मनाची घालमेल तो अगदीच समजू शकत होता.
                   समुद्रकिनाराच्या थोडेसे जवळ जाऊन तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि नाटकीपणाने तिला म्हणाला,"हे सॅनुरिटा ,ये बारिष की बुंदे जिस शिद्दत से संमदर मे मिल रही है ,उतने ही शिद्दत से में तुमहें चाहता हु और दुनिया की कोई ताकत अब हमे जुदा नही कर सकती"
त्याचा हा नाटकी अविर्भाव बघून तिला हसू आलं.तिच्या ओठांवरच हसू आपल्या ओठांनी टिपत त्याने तिला जवळ ओढलं.थोडा वेळ असाच गेल्यावर ते समुद्रकिनारी चालू लागले.
         आता ती थोडीशी शांत झाल्यासारखी त्याला वाटली.त्याने तिला विचारलं या "लाटा पाहून काय वाटतं"?
"छानच वाटणार ना मी नाही समजले".तो बोलू लागला,"हे बघ या लाटा कश्या एकामागून एक आवाज करत एकाच गतीने किनाऱ्याकडे येत आहे ,त्यातला काही किनाऱ्याला स्पर्श करतीलही पण काही मागेच विरून जातील किनाऱ्यापर्यंत पोहचणार ही नाही.तसंच आपल्या आयुष्यात येणारी माणसं काही काळ आपल्याबरोबर असतात आणि कालांतराने लाटेसारखी विरून जातात,त्यामुळे दुःख होणं हे साहजिक असलं तरी आयुष्यात पुढे जाणं हे ही तेवढंच महत्वाचं आहे."
               "आईबाबांचे अचानक जाणं हे कुणाच्याही हातात नव्हतं की कुणामुळेही नव्हते.जेवढ्या लवकर तू या दुःखातून बाहेर येशील तेव्हढं तुलाच बरं वाटेल.आता तुझ्यासोबत मी आहे,तुझी काळजी घेण्यासाठी,तुझ्यावर प्रेम करण्यासाठी.तुला असं नाही वाटत का भूतकाळाचे दुःख कुरवाळत आणि भविष्यकाळाची चिंता करत जगण्यापेक्षा आपण आपला वर्तमान आनंदात घालवू."
               त्याचे म्हणणे तिला पटले आता ती स्वतः त्याच्या मिठीत शिरली व त्याचा कानात कुजबुजली "माझं तुझ्यावर आणि या आपल्या पावसावर पण खूप प्रेम आहे".हे ऐकून तो खूप खुश झाला,अन तिचा हात हातात घेऊन बोलला,"ठरलं तर मग आता प्रत्येक पहिला पाऊस आपण समुद्रकिनारी एकमेकांसोबत एन्जॉय करायचा.
                हळूहळू सूर्यास्ताची वेळ झाली होती पण त्यांच्या नात्यात नवीन सूर्योदय झाल्यासारखे ती,तो आणि त्यांचा पाऊस आपल्या घरट्याकडे परतत होती.

रजनी✍️

               


 


 

 

Sunday, 24 January 2021

ती येते का?



लग्न ठरल्याने स्वारी भलतीच खुश झाली
तिला घेऊन राजरोसपणे फिरावायस गेली
लाजत मुरडत गप्पा टप्पा ,सोबत
पाणीपुरी ही खाऊन झाली अन
निरोपाच्या वेळी ती आठवत म्हणाली
इतका वेळ बोललो,पण एक विचारायचं राहील
एकच का राणीसरकार,आणखीही विचारा
इम्प्रेस करण्यासाठी मी ही मग डायलॉगबाजी केली
ती येते का हो नेहमी तुमच्या घरी?
क....कोण ती म्हणतं मी जीभ चाचरली
अन मनातल्या मनांत गर्लफ्रेंडसची यादी तयार केली
"अहो तीच ती ना नात्याची ना गोत्याची पण
करते मदत मोलाची"
कोड्यात बोलायची बायकांची नेहमीचीच सवय
एवढ्यातच त्याला ह्याचा येऊ लागला प्रत्यय
चेहरा नॉर्मल ठेवत ,कोण ग तो म्हणाला
तिच्यासाठी होण्याऱ्या सौ.ने उखाणाच घेतला
.
.
.
.
.
.
.
.
अहो केरवार,धुणीभांडी,साफसफाई
अन स्वयंपाकाची गडबड ,
त्यात असे पाहुण्यांचा राबता
कामवाली येता घरा
सुख लाभे गृहलक्ष्मीच्या जीवना.
.
.
.
.हुश्श म्हणत मी सुटकेचा निःश्वास सोडला
अन कामवाली शोध मोहिमेचा निश्चय पक्का केला.

रजनी✍️



 

Thursday, 21 January 2021

नाते तुझे माझे



 

नाते तुझे माझे
हल्लीच जुळलेले
कळत नकळत
जवळ आलेले

विविध रूपांनी तुझ्या
पाडली मज भुरळ
तुझ्याशिवाय नसण्याची
करू लागले हळहळ

येता जाता बाहेर आता
तुझे सोबत असणे
इन्फेक्शन पासून मला
तुझे सतत वाचवणे

म्हणूनच सांगते सर्वाना
मास्कशी नाते जोडा
आपली जबाबदारी पाळा
अन करोना टाळा

रजनी✍️




 

Wednesday, 20 January 2021

ती अजूनही आहे


 

ती अजूनही आहे
मनाच्या खोल तळात
हळूच येऊन वर
डोकावते विचारांत

आगमनाने तिच्या
बदलते दृष्टी
बदलते नातं अन
बदलत जातात सर्वच गोष्टी

जाण्याने तिच्या माणूस
सुखी होणार आहे
पण जाता जात नाही
अशी प्रत्येकाला चिकटलेली जात आहे

रजनी✍️

Sunday, 17 January 2021

अंधश्रद्धा

 


पुढारलेल्या समाजाची
कुंठित झाली मति
कुठे चेटूक,कुठे करणी
तर कुठे चाले भानामती

अहो नरबळी देऊन प्राप्त
होत नसते समृद्धी
यज्ञकुंडात या लागते
फक्त कर्माचीच आहुती

अंधश्रद्धेची सोडून साथ धरुया
श्रद्धा आणि विज्ञानाची कास
हीच खरी आदरांजली असेल
आदरणीय विज्ञानवादी दाभोळकरांस

रजनी✍️


Thursday, 14 January 2021

तुझा अबोला



 

तुझा अबोला माझ्याशी
न बोलताही बोलतो
लटक्या रुसाव्याचे
गुज मज सांगतो
माळता मोगरा केसांत
सुगंध त्याचा दरवळतो
मिठीत येता माझ्या
अबोला तुझा हसतो
अन सलज्ज हास्याने या
माझ्या काळजाचा ठोका चुकतो

रजनी✍️

 


 

Tuesday, 12 January 2021

लायब्ररीमधली "ती"


लायब्ररी मधली "ती"
मला खूप आवडायची
नुसतं पाहूनच तिला
चित्तवृत्ती प्रफुल्लीत व्हायची
सोबतीने तिच्या वेळ मजेत जायचा
सुगंधाने तिच्या मेंदू उत्तेजित व्हायचा
स्पर्शाने तिच्या माझ्यात उत्साह संचारायचा
संगतीत तिच्या छान अभ्यास व्हायचा
कॉलेजचे ती वर्षं लायब्ररीत सरली
भव्य लायब्ररी अन लायब्ररीतील ती
गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी
.
.
.
.
.
.मिस यू माझी
.
.
.
.
..
कॉफी वेंडिंग मशीन☕😊😊😁😁😁😁😁

रजनी✍️



अँटी व्हायरस(अहंकारावर)



तुझ्या माझ्या नात्यामध्ये
तू मास्टर मी स्लेव्ह
तुझा हा अहंकार
मी नेहमीच केला सेव्ह
आऊट डेटेड सिस्टिम
माझी अपग्रेड झाली
स्वाभिमानाचा अँटी व्हायरस
डाउनलोड करती झाली
अहंकाराचा व्हायरस
डिलिट त्यात झाला
अन प्रेमाचा पासवर्ड
नवा आपलं नातं
अपडेट करू लागला.

रजनी✍️


 

Wednesday, 6 January 2021

प्रवाहाच्या विरुद्ध "मी"


 

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण सोडून दिले आहे
मी आता मन मारून जगणं

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण प्रत्येक गोष्टीसाठी
आता माझं एक मत असणं

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण जुन्या वाटा चालतांना
माझं नवीन मार्ग शोधणं

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण पेहरावा सोबतच आता
माझ्या विचारांचं बदलणं

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण इतरांची मर्जी झेलताना
माझं स्वाभिमान जपणं

त्यांना नेहमीच वाटतं
प्रवाहाच्या विरुद्ध माझं वागणं
कारण स्वतःच्या सोबतीने
माझं आत्मविश्वासाने जगणं

रजनी✍️


अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...